श्री मंगेश महादेवाची कृपा सतत रहावी यासाठी हरप्रकारे यत्न करतात.
विवाह झाल्यानंतर नवदांपत्य प्रथमच सर्व परिवारासह देवदर्शनास येतात.
नवीन नवरा नवरी स्नान करून श्री मंगेश देवालयाच्या समोरील तलावावर विधिपुर्वक मंत्रस्नान करतात.
यानंतर श्री मंगेशीचे मनोभावे साग्रसंगीत दर्शन होते.
हे सर्व विधी तेथील घैसास गुरूजी नवदांपत्याकडून करून घेतात याला गांठवल असे म्हणतात.
श्री मंगेशीस घुड भरणे,रूद्रावर्तन पंचामृतासह एकादष्णी ,अभिषेक नैवेद्य ,लघुरूद्र बेड्यांचा, महारूद्र शिंगांचा
रंगपुजा,नंदादिप ,देवालयीतील तीनदारी दीप आराधना.
इतकेच नव्हेतर दीपस्तंभ सुशोभित करून दिवे लावले जातात.
देवालयाच्या इमारतीवर पणत्यांची दिप आराधना होते.
जेव्हा जेव्हा असे पणत्यांचे दिप प्रज्वलीत होतात तेव्हा ते दृश्य फार मनोहारी असते.
नभीच्या तारका जणू श्रीमंगेशीच्या चरणी समर्पित होण्यासाठी अवतरल्या सारखे वाटते.
यानंतर पंचदेव नैवेद्य ,श्री सांतेरी व श्री निरंकारास नैवेद्य ,श्री काळभैरवास वड्यांची माळ स्वत: यजमान किंवा
पुरोहितींकडून अर्पण करून नैेवेद्य दाखविला जातो.
श्री मंगेशीस सहस्र बेल ,लक्षबेल वाहून प्रसन्न करतात.
लक्ष बेल अर्पण करताना शेवटचे त्रिदल सुवर्णाचे अर्पण करतात.
अन्नसंतर्पण हे कटाक्षाने देवालयाच्या अग्रशाळेतच करतात.
ब्राम्हण सवाष्ण भोजन ,मुळकेश्वर यांच्यासाठी एक गावड्यास भोजन देऊन दक्षिणा दिली जाते.
असे श्रीमंगेशीस प्रिय होतील असे सर्व विधी परंपरेने अत्यंत श्रद्धेने केले जातात.
दर सोमवारी जो शिबीकोत्सव होतो यात सुंदर सुशोभीत केलेल्या पालखीत श्री मंगेश महादेव स्वर्गीय अशा थाटात
विराजमान असतात.
ही सोमसुत्री प्रदक्षिणा असते.
ही प्रदक्षिणा घालत असताना पालखी सोळा ठिकाणी थांबते याला पेणे असे म्हणतात.
जेव्हा ही पालखी मंदिरातून निघते तेव्हा बरोबर देवस्थानचे वैदिक ब्राम्हण,त्यावेळी आलेले महाजन, वाद्ये ,वाजंत्री ,
सेवेकरी, किर्तन करणारे ,नृत्यगायन करणारे , गुढ्या, तोरणे ,अब्दागिरी,छत्रचामरे, सुर्यपान घेतलेले
हिलामतदार,दिवट्या घेतलेले मशालजी,मंगलदिप घेतलेल्या भावीण , चांदीच्या नक्षीदार पात्रांमधे सुगंधीत गंध ,धुप
घेवून भटजी उपस्थित असतात.
भक्तजन श्री मंगेश महाराजांना चव-या, मोर्चेल घेवून मन भक्तीने ओथंबलेल्या स्थितीत वारा घालतात.
देवस्थानचे कमाविसदार हातात सुंदर नक्षीयुक्त सुवर्णाचा राजदंड घेवून पालखी सन्निध उभे असतात.
प्रत्येक थांब्यानंतर म्हणज पेण्या नंतर कमाविसदारांनी नम: पार्वतीपते हरहर महादेव असा घोष केला पालखी पुढे
जाते.
यावेळी ब्राम्हण वेदघोष,रूद्रसुक्त श्रीमंगेश अष्टक म्हटले जाते.
झुलवे गायले जातात.
असा सर्व सरंजामात सोमसुत्री प्रदक्षिणा घातली जाते.
अापल्याला अत्यंत स्वर्गीय आनंद अनुभवास येतो.
अशा परम पवित्र स्थानी जावून हा नेत्रसुखद सोहळा पहावा या सारखे भाग्य नाही.
कारूण्यसिंधू श्री मांगिरीषाय नमो नम:
Mangeshi temple goa
🌷🌷🙏🙏🙏🌷🌷
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा