सारस्वत ब्राम्हण ही पंचगौड ब्राह्मणांतील एक उपजात.
या जातीची मूळ वस्ती गोमंतकात झाली.
इ.स.च्या १४व्या शतकात मुसलमानांनी गोव्यावर कबजा केला,
तेव्हा त्यांनी हिंदूंना बाटवून मुसलमान करण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी हिंदूंची देवालये नष्ट भ्रष्ट केली आणि हिंदूंचा परोपरीने छळही केला.
या धार्मिक गंडांतरातून स्वधर्माचे रक्षण व्हावे म्हणून अनेक गोमंतकीय सारस्वत घराणी कोचीनला जाऊन स्थायिक झाली.
इ.स.च्या सोळाव्या ते अठराव्या शतकांत पोर्तुगीजांनी मोठ्या प्रमाणात हिंदूंचा छळ करून धर्मांतर घडवून आणले.
त्याही वेळी सारस्वत व इतर जाती यांनी गोवा सोडला.
गोव्यात तिसवाडी, साष्टी व बारदेस या तीन तालुक्यातच प्रथम सारस्वतांची वसाहत होती.
ते उत्तर व दक्षिण कानडा, कोचीन संस्थान, उत्तरेकडे रत्नागिरी जिल्हा व पूर्वेकडे बेळगाव, हुबळी, धारवाड वगैरे ठिकाणीही गेले.
पुढे मराठेशाहीत, पेशवाईत व आंग्रशाहीत नशीब काढण्यासाठी अनेक सारस्वत घराणी पुणे, मुंबई, बडोदे, इंदूर,
ग्वाल्हेर वगैरे ठिकाणी जाऊन स्थायिक झाली. गोव्याशिवाय मुंबई व कोचीन या ठिकाणी त्यांची वस्ती केंद्रित
झाली असून, वर सांगितलेल्या सर्व ठिकाणी ती विखुरलेली आहे.
सारस्वत ब्राह्मण हे उत्तरेतून गोव्याला आले व परशुरामाने त्यांना गोव्यात आणले अशी परंपरागत समजूत आहे.
याचा ऐतिहासिक अर्थ एवढाच आहे, की परशुरामाने अनार्यव्याप्त पश्चिम किनाऱ्यावर आर्यांच्या वसाहती स्थापन केल्या.
त्या करताना त्याने आर्यावर्तातून ब्राह्मणादि आर्यकुलांना कोकण, मलबार व केरळ या भागांत नेले.
ज्या काळात ही ब्राह्मणकुळे त्याने कोकणात नेली त्या काळात जातिव्यवस्था निर्माण झाली नव्हती.
अर्थात गुर्जर, चित्पावन, हबिग, तुळुब, करहाटक, पूतिरी अशा ब्राह्मणजाती निर्माण झाल्या नव्हत्या.
सर्व ब्राह्मणांची पंचगौड व पंचद्रविड अशी विभागणीही झाली नव्हती.
म्हणजे गोव्यात जी ब्राह्मणकुळे परशुरामाने आणली ती केवळ सारस्वत ब्राह्मणांची होती, असे म्हणता येत नाही.
ती ब्राह्मणकुळी होती एवढेच म्हणता येईल.
आणि तरीही परशुरामाने दहा गोत्रांचे सारस्वत ब्राह्मण यज्ञकार्यार्थ गोव्यात आणले व त्यांना तिथे वसविले, अशा सह्याद्रिखंडाचा आधार देऊन सांगितले जाते.
सह्याद्रिखंडातील यासंबंधीचा श्लोक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा