![]() |
श्री शांतादुर्गादेवीच्या अवतारातील स्कंद पुराणात मंगिरीश हे नाव कसे पडले

श्री शांतादुर्गा देवी अवताराची स्कंद पुराणातील सह्याद्रि खंडातील अशी एक आख्यायिका आहे की, एकदा कैलास पर्वतावर जगतपिता श्री शंकर व माता पार्वती सहजच सारीपाट खेळण्यासाठी बसले. हास्यविनोदात खेळ चालला होता. इतक्यात तिथे ब्रम्हदेव पुत्र नारद मुनिंचे आगमन झाले.
भविष्यात सृष्टीत काही घडायचे असेल तर नारदमुनीं पूर्व सुचना म्हणुनच प्रकट होतात अशा अनेक गोष्टी पुराणात आहेत. असो अगदी असेच घडणार होते आणि म्हणुनच की काय गौरीहराच्या या सारीपाटाचा खेळ चालला असताना नारद मुनीं कैलासावर आले. मग काय त्यांचे शिवपार्वतीच्या सारीपाट खेळाचे निरीक्षण सुरू झाले. काही कळ तर ते काढणारच होते.
नारदमुनी म्हणाले, " महादेवा , तुम्ही सारीपाट तर खेळत आहात, पण या खेळात पैज लावल्याशिवाय काही मजा येत नाही. पैज लावून खेळा देवा .
मग काहीतरी मौज येईल". झालं मग काय पार्वती देवीही ही तयार झाल्या.
![]() |
| Shantadurga devi |
पैजेवर शिवपार्वतीचा द्युत सुरू झाला. पार्वती मातेने भोळ्या सांबाचे सहजपणे बघता बघता त्रिशुळ , डमरू, नंदी, व्याघ्रासन ,असे सर्वकाही जिंकून घेतले.अगदी त्यांचे तपस्थान कैलासही जिंकून घेतला. निलकंठ पुर्णपणे
हरले दिगंबर झाले. हे पाहून नारदमुनी महादेवांना म्हणाले, "हे काय देवा , तुम्ही तर सर्वस्व हरले. अंबेने तुम्हास परास्त केले. आता तुमचा विश्वात लौकीक तो काय राहीला?
असे सर्व घडामोडीचे काम करून नारदमुनींनी नारायण नारायण करीत तिथुन काढता पाय घेतला.
नंतर हरलेल्या अवस्थेत झालेल्या गोष्टीचा महादेवांना पश्चाताप झाला. ते कैलासासकट सर्वस्व हरून बसले होते. पैजेप्रमाणे त्यांना कैलास सोडणे भाग होते. मनस्ताप झाल्यामुळे मन:शांती साठी गौरीपतीस तप:साधनेची आवश्यकता होती. म्हणून श्री शंकर कैलास सोडून निघाले.
ठिकठिकाणी तप:साधना करीत करीत फिरत असता गोमंतक प्रांतात आले. हा सुंदर रमणीय परिसर त्यांना खुपच आवडला. याचठिकाणी त्यांनी वास्तव्य करायचे ठरविले. अघाशी नदिच्या रम्य किनारी कुशस्थली येथे तप:साधनेत कर्पुरगौर रममान झाले. याच वेळी त्यांचा परमभक्त लोमेश शर्मा या ब्राम्हणास महादेवांनी मगरीच्या तावडीतून सोडविले.
शंकर भगवानांनी प्रत्यक्ष येऊन आपल्याला संकटमुक केले हे पाहुन लोमेश शर्मा अत्यंत भावविभोर होवून श्री शंकराची स्तुती करू लागले , लोमेश शर्माच्या निरतिशय नि:सिम भक्तीने व आर्ततेने धावा केल्यामुळे श्री शंकर त्या ब्राम्हणावर प्रसन्न झाले व त्यास वर मागण्यास सांगीतले. तेव्हा त्या प्रेमळ भक्ताने महादेवास कायमचे याच ठिकाणी रहावे व देवा तुमची नित्य सेवा भक्ती घडावी व ज्या मगरीने त्यास पकडले होते तीलाही महदेवांनी मुक्त करावे असा वर मागीतला. सांब सदाशिवांनी प्रसन्न होवून त्याची इच्छा पुर्ण होईल असा वर दिला.
दरम्यान इकडे कैलास पर्वतावर आपले प्रिय नाथ नाहीत. ते खरोखरच आपल्याला येथे सोडून निघून गेले याची पार्वती देवींना प्रकर्षाने जाणीव झाली. सगळीकडे शोधुनही महादेव दिसेनात हे बघून जगत्जननी हिरमुसली व कैलास सोडून महादेवांच्या प्राप्तीसाठी रानोमाळ हिंडू लागली . शोध करत असता पार्वती मातेचही गोवे प्रांतात अागमन झाले.
त्रिकालदर्शी श्री शंकरांना याची जाणीव झाली. त्यांच्या विरहात देवीची झालेली व्याकुळ अवस्था पाहून महादेवांना करूणा आली. आता फार अंत न पाहता पार्वतीस दर्शन द्यावे असे त्यांच्या मनी आले. पण पुन्हा त्या हिमनग कन्येची परिक्षा घ्यावी असा खट्याळ विचार करून त्यांनी भयंकर अक्राळ विक्राळ व्याघ्राचे रूप धारण केले. व जेथे पार्वती माता होती तेथे येवून मोठ्याने डरकाळी फोडली.
तो भयंकर वाघ पाहून ती शैलपुत्री खुप घाबरली व त्राही मां गीरीश अशी आर्त हाक मारली .हे पाहून त्रिपुरारि व्याघ्ररूप टाकून आपल्या मुळ रूपात प्रकट झाले. आपले आराध्य असे समोर आलेले पाहून हिमनंदीनी आनंदुन गेली हे पाहून महादेवही तिच्या भक्तीने प्रसन्न झाले व कधीही तिचा त्याग करणार नाही असे वचन दिले.श्री शंकरांनी लोमशर्मासही कुशस्थली सोडून जाणार नाही असा वर दिला होता.
पार्वती देवीने आपणास जसे मांगीरिश अशी हाक मारताच आपण माझे वियोगाचे दुःख दुर केले तसेच जे कोणी भक्त मांगीरीश या नामाने तुमची आराधना करतील त्या भक्तांची दुःखे दुर करून त्यांची मनोकामना आपण पुर्ण करावी असा वर मागीतला .
पार्वती देवींची ही इच्छा ऐकून महादेवही प्रसन्न झाले व तेथेच मांगीरिश या नावाने राहीले व माता पार्वतीही पतीदेवांच्या तप:साधनेत व्यत्यय नको म्हणून थोड्या दूर अंतरावर केळोशीस शांतादुर्गा नावाने कायमचे वास्तव्य करून राहीली. अशा प्रकारे पार्वती देवीे गोवे प्रांती श्री शांतादुर्गा नावे प्रसिद्ध झाली. श्री शांतादुर्गा देवी गौड सारस्वतांच्या कौशीक गोत्री लोकांची कुलदेवता आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा