आदिशक्ती हिच श्री शांतादुर्गा
आदिशक्तीने वेळोवेळी अनेक अवतार घेवून प्रचंड राक्षसांचा बिमोड केला त्यांचे हनन केले हे आपल्या सर्वांना माहित आहे. परंतु प्रत्यक्ष श्रीहरी व श्री शंकर यांच्यात कसा समेट घडवून आणला याबद्दल जाणून घेवू.
अशी कथा आहे की, फार प्राचीन काळी श्री विष्णु व श्री शंकर यांच्यात कदाचित अहंभावाने वाद निर्माण झाला. म्हणता म्हणता हा वाद इतका विकोपाला गेला की युद्ध परिस्थिति निर्माण झाली. कोणीही माघार घेईना. दोघांनाही आपल्या सामर्थ्याचा गर्व झाला . आपणच श्रेष्ठ आहोत असे दोघांनाही वाटू लागले. त्याचे पर्यवसान भयंकर युद्धात झाले. घनघोर युद्ध जुंपले . सगळीकडे हाहा:कार माजला. दोन्हीकडूनही अत्यंत घातक अस्र शस्रांचा मारा होऊ लागला. कोणी कोणास ऐकेना.
हे युद्ध पाहून ब्रम्हदेव मात्र खुप चिंतेत पडले. तपःसाधना करून महत्प्रयासाने त्यांनी सृष्टी निर्माण केली. तिचा होत असलेला असा विनाश पाहून त्यांना फार फार वाईट वाटत होते ,सहन होत नव्हते. युद्धात होणारा ध्वनी कल्लोळाने ते व्यथीत झाले.
काय आणि कसे करावे हे त्यांना समजेना. दोघांच्या क्रोधाला कसा आवर घालावा या विवंचनेत पडले. दोन्ही देवांनी शांत व्हावे असे त्यांना मनोमन वाटले आणि अशा स्थितीत असतांनाच त्यांना आदिशक्तीचे स्मरण झाले. अतिशय आर्ततेने ब्रम्हदेवांनी मनोभावे आदिशक्तीची विनवणी केली, त्यासरशी ब्रम्हदेवांच्या स्वयंतेजातून आदिशक्ती प्रकट झाली.
हे ईश्वरी , या दोघा हरीहरांना कसलेही भान उरलेले नाही. अतिशय क्रोधित होवून हे अघोरी युद्ध करीत आहेत. तीनही लोकांमधे या युद्धाने त्राही त्राही केले आहे. हे देवी कृपावंत हो व हे भिषण युद्ध थांबव अन्यथा ह्या सृष्टीचा विनाश अटळ आहे.
ब्रम्हदेवांची ती गलीतगात्र झालेली अवस्था पाहून त्या तेजोनिधी आदिमाया जगत्जननीने त्यांना आश्वस्थ केले. निर्भय केले व स्वताः अतिक्रोधाने संतप्त झालेल्या श्रीहरी व श्री शंकर या दोघांमधे उभी राहीली. पळभर दोघेही थांबले आणि तेव्हाच मोठ्या चातुर्याने त्या आदिमायेने दोघांनाही समजाविले.
त्यांच्या ठायी असलेल्या ज्या अनंत अगम्य शक्ती आहेत त्या सृष्टी कल्याणासाठी आहेत. आपण मुलतत्व आहात ,तेव्हा दोघांनीही आपला तुच्छ अहंकार सोडून शांत व्हावे व जगतकल्याण करावे असे अत्यंत प्रेमाने समजावून सांगीतले. त्याबरोबर दोघांनाही आपली चुक कळली. परस्परांच्या आत्यंतिक द्वेषाने आपण काय करायला निघालो होतो याची त्यांना जाणीव झाली. तेव्हा दोन्ही देवांनी अनन्य भावे देवीस शरण येवून कृपाशिर्वाद संपादन केला. सृष्टीचा होणारा विनाश आदिमायेने प्रसंगावधान राखून थांबवला व मोठ्या खुबीने शांतता प्रस्थापित केली , म्हणून या तिच्या अत्यंत दिव्य, नितांत सुंदर , निर्मळ रूपास शांतादुर्गा हे नाव शोभले व पुढे याच नावाने ती प्रसिद्ध झाली .
आदिशक्तीच्या अनेक अवतारांपैकी शांतादुर्गा हे स्वरूप दोन महान देवांमधे सख्य घडवून आणले म्हणून फार वैशिष्ठ्यपुर्ण आहे. अशी ही तेजस्वी,ओजस्वी ,परमदयाळू शांतादुर्गा आपल्या भक्तांनाही तत्परतेने संकटमुक्त करते. फक्त अत्यंत श्रध्देने हाक मारावी. सर्व विश्वाची आई , ती येतेचे धावून आपल्यासाठी.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा