परचक्र काळात गोमंतकातील मंदिरे.
तीर्थ रामकुंड कुडमलादिक तीर्थांची स्थापना केली, आणि अशा प्रकारे ती पवित्र स्थाने निर्माण करून या ठिकाणी परशुराम वास करून राहिला.
पुढे काही दिवसांनी त्याने दिग्विजयार्थ एक यज्ञ करण्याचे ठरविले.
त्याच्या सिद्धिसाठी पुष्कळ विद्वान ब्राम्हणांची गरज असल्याने उत्तरेकडील त्रिहोत्र (तिरहुन), देशातून आपले आप्त भारद्वाज कौशिक, वत्स, कौडिण्य, कश्यप, वसिष्ठ, जमदग्नि, विश्वामित्र, गौतम आणि अत्रि अशा महान तपस्वी विद्वान सारस्वत ब्राम्हणाना दक्षिणेत गोमतकात आणून परशुरामाने आपले यज्ञाचे काम संपन्न करून घेतले .
गोमंतक पर्वतांच्या आसमंतातील अष्टग्रामांत अग्रहारे देऊन तेथे त्यांची स्थापना केली.
मठग्राम, वरेण्य, कुडतरी, बाणावली, शंखावली, रायचूरी, लोटली आणि नागवे यांस अष्टग्राम म्हणतात.
मुख्यत्वेकरून एव्हापासून दक्षिण प्रांती सारस्वत ब्राम्हणांचा प्रवेश समजण्यात येतो.
त्या पूर्वी एका परशुरामावांचून दुसरे सारस्वत ब्राम्हण कोणी नव्हते.
हा दिग्विजय यज्ञ गोमंतकामध्ये पेडणे प्रांताच्या हरमल गावी झाला असे परंपरागत आख्यायिकेवरून समजते.
परशुरामाने जे दहा सारस्वत बाम्हणऋषी आणले त्यांची सहासष्ट कुळे होती.
त्या सहासष्ट कुळांतून कुशस्थळी आणि केळोशी या दोन क्षेत्रांत कौत्स, वत्स आणि कौडिण्य ह्या तीन गोत्रस्थ ब्राम्हणांची दहा-दहा कुळे स्थापिली.
बाकी जी गोत्रे राहिली त्यातून मठग्राम, वरेण्य, लोटली आणि कुडतरी या चार ग्रामांत सहा-सहा कुळे चूडागणि (चोडण), महाक्षेत्रांत दहा कुळे आणि दीपवति (दिवाडी) व गोमंचलाच्या मध्यभागी बारा कुळे स्थापिली.
याप्रमाणे सहासष्ट कुळांची स्थापना करून त्यातील मुख्य ब्राम्हणांस १६ गावांचा अधिकार दिला.
हा अधिकार अजून पावेतो त्यांकडेच वंशपरेपरेने चालत असून नंतरच्या काळात जरी गोमंतकप्रांत फिरंगी, क्रिस्ती धर्मीय, पोर्तुगीज सरकारच्या स्वाधीन गेला, तरी ते त्या गावचा कर (फोर) सरकारास देवून त्या गावचे उत्पन्न आपआपल्यांत वाटून घेत असत.
जे सारस्वत ब्राम्हण नंतरच्या काळात फिरंगी पायांनी बलात्काराने बाटविले त्यांस देखील हा अधिकार आहे.
कालांतराने गोमंतक व आजुबाजूच्या प्रांतात निरनिराळ्या देशीराजांची राज्ये चालू लागली त्यात मौर्य, कदंब, चालुक्य, वंशाचे राजे, त्यानंतर विद्यानगरचे, बेदरचे बहामनी संज्ञक मुसलमान राजे, विजापुरचे मुसलमान राजे आणि त्यांचा मांडलिक, सौदेकर राजा, सावंतवाडीकर मराठे राजे हे अधिकारावर आले.
या सर्व संस्थानिक राजवटीमध्ये त्या त्या राजांच्या कारकीर्दीत सारस्वत ब्राम्हणांच्या प्रभावी बौद्धिक सामथ्याचे सहकार्य त्यांना मिळत गेल्याने त्यांच्या राज्यांचा भरीवपणा वाढत गेला.
अधिकारावर सारस्वतांच्याच नेमणुका होत गेल्याची माहिती गतेतिहासांतून वाचावयास मिळते म्हणून यांचाही लौकिक व विस्तार वाढत गेला.
नानाविध कारणामुळे उत्तरेकडील वसाहती सोडून दक्षिणेत काही सारस्वत बाम्हण कुटुंबे गोमंतक प्रांत व आसपासच्या भागांत वसाहती करून जी राहिली, त्यांचे सांस्कृतिक धर्म व राजकारण ही दोन्ही व्यवस्थित चालल्याने समाजशासनही उत्तम होऊ लागले.
पण, ही परिस्थिती त्यांना फार काळ लाभली नाही.
परकीयांच्या आक्रमणानंतर गोमांतकातील देवालये
इसवी सन १३१३ मुसलमानांनी देवगिरीच्या यादव वंशाची समाप्ती केल्यावर ते मुसलमान गोमंतकांत येऊन बंड करू लागले.
त्यांनी येथील पुष्कळ देवालये मोडून टाकली आणि राज्याधिकाऱ्यांस हाकलून आपण राज्य करू लागले.
परंतु पुढे इ.स. १३६७ मध्ये विजयनगरचे राजे हरिहरराय यांचे पदरी असलेले मुख्यमंत्री माधव उर्फ माधवाचार्य यांनी पुष्कळ सैन्यानिशी गोमंतकात येऊन मुसलमानांस हाकलून दिले आणि मुसलमानांनी मोडलेली देवालये पुन्हा बांधली व त्या माधवचार्यानी श्रीसप्तकोटीश्वराची पुनःस्थापना केली.
तरी पण, मुसलमानांनी आपले आक्रमण थांबविले नाही. माधवाचार्यांच्या स्वर्गवासानंतर हरिहररायाने नरहरी मंत्री यास प्रधान नेमून गोमंतकांत पाठविले.
पुढे इ.स. १५१० साली फिरंगी लोकांनी समुद्रमार्गे येऊन अकस्मात गोमंतकावर घाला घातला आणि लढाई होता होता त्यांचा अधिकार पक्का झाला.
पराकाष्ठेचा क्रूरपणा चालवून हिंदूंची घरे, गोत्रे आणि देवालये बाटविणे.
तोंडात दांडगाई करून खुपसणे अशा कृत्यांचा सपाटा चालविला.
हिंदूंनी प्रतिकारार्थ दंगे केले. परंतु शत्रु एकमताने वागणारे आणि हिंदु परस्परांमध्ये कलह करण्याच्या कामी अत्यंत प्रवीण यामुळे शत्रुच विजयी झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा